आरोग्य आणि स्वच्छता

नेहमी इतरांची काळजी घेणा-या स्रीया स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. घरातील कोणाला ताप आला तर रात्रभर त्याची सेवा करणारी आई, स्वतःला काही त्रास होत असेल तरीही तक्रार करत नाही. दुखणे अंगावर काढते. स्रीचे आरोग्य कुटूंबासाठी दुय्यम आहे ही समजूत बदलणे इतके सोपे नाही. हीच बाब  लक्षात घेवून कुटूंबासाठी पोषण आणि स्वच्छता यापासून आपल्या शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात केली जाते. स्रीयांना समुपदेशन केले जाते. स्वच्छ, आरोग्यदायी, पौष्टीक पाककृती महिलांना शिकवल्या जातात. पाककृती स्पर्धांमध्ये आरोग्यपूर्ण आहाराला गौरविण्यात येते. त्याचा परीणाम म्हणून कुटूंबाचे पालन पोषण सुदृढ अन्नघटकांनी होते.

स्री रोग, मासिक पाळी आदींबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ महिलांशी संवाद साधतात. मानसिक आरोग्य, उदासीनता आणि तणाव-व्यवस्थापनाबद्दल समुपदेशकांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. यातून त्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. योगासने, ध्यान आणि व्यायामावर अभ्यास व सराव सत्र आयोजित केली जातात. त्यामध्ये जाणकार मार्गदर्शन करतात.

प्रशिक्षित कर्मचार्‍यांच्या मदतीने आम्ही आमच्या महिलांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती शांतपणे हाताळण्यासाठी शिक्षित करतो. डॉक्टरांशी संवाद कसा साधायचा, वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सूचना आणि पॅथॉलॉजी अहवाल कसे समजून घ्यावे याविषयी माहिती दिली जाते. आम्ही सहभागींना लक्षणे कशी ओळखावीत, त्यावर करावयाचे उपचार, प्रतिबंध याविषयी तज्ञांमार्फत प्रशिक्षण देतो.