काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्याने आपल्या दोन मुलांचे पालनपोषण करण्याची सर्व जबाबदारी सरीतावर आली. जेव्हा ती ग्यान रुचीच्या सत्रासाठी येऊ लागली तेव्हा ती अंतर्मुख व्यक्ती होती, तिची सर्वात मोठी इच्छा होती की स्वतःचे घर असावे.
ग्यानरुची शास्त्री नगर येथे गेली पाच वर्षे काम करत आहे. संस्थेच्या कार्यातून महिलांना मानसिक आणि सामाजिक आधार मिळतो. जेव्हा सरिताचे घर पडले तेव्हा ती समुदायाच्या पाठिंब्याने घरासाठी निधी उभारू शकली आणि नवी आव्हाने घेण्यासाठी ती पुन्हा तयार झाली. सरिताला लक्षात आले की आता ती एकटी नाही!
*नाव बदललेले आहे.
नीलिमा नेहमीच कामात व्यस्त असते. सतत काहीतरी नवे शिकायला तीला नेहमी आवडते. किष्किंधानगर येथे ग्यानरुचीने आयोजित केलेल्या कागदी पिशवी बनविण्याच्या उपक्रमात तीने मन लावून लक्ष दिले. ज्या महिला कामासाठी बाहेर जावू शकत नाहीत त्यांच्यासाठी ते उत्पन्नाचे एक उत्तम साधन बनू शकते हे लक्षात आल्यावर निलीमाने वस्तीमधील इतर महिलांना कागदी पिशवी बनवायला शिकवले. एवढेच नव्हे तर स्वतः सुध्दा पिशव्या बनवून विकू लागली. शास्रीनगर, जयभवानीनगर, सुतारदरा, हडपसर येथे ग्यानरुचीने आयोजित केलेल्या कागदी पिशवी बनविण्याच्या प्रशिक्षण शिबीरात नीलिमाने इतर महिलांना प्रशिक्षण दिले. ग्यानरुचीमध्ये सहभागी होणा-या महिलांनी आपले ज्ञान, कौशल्य, अनुभव याची देवाणघेवाण इतर महिलांशीही करावी असा आमचा आग्रह असतो. या माध्यमातून महिलांची वैचारीक व सामाजिक प्रगती होईल असा विश्वास आहे.
रिया, विजया आणि दीक्षा यांनी नीलिमा भोसले यांच्याकडून पेपर बॅग बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक-पिशवी बंदीची घोषणा करताच या तिन्ही महिलांना संधी दिसली. त्यांनी हातांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या विकण्यासाठी दुकान, स्थानिक भाजी विक्रेते आणि किराणा दुकानदाराशी संपर्क साधण्यास सुरवात केली. यातून त्यांना चांगला लाभ झाला.
सुप्रिया या डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडी येथे अंगणवाडी शिक्षिका आहेत. प्रयोगशील असलेल्या सुप्रिया यांच्याकडे येथील ग्यानरुची सेंटरची जबाबदारी आहे. ग्यानरुचीच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात, सत्रात त्या स्वतः हजर राहतात आणि इतर महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करतात. ग्यानरुची आणि अंगणवाडी यांच्या उपक्रमांची सांगड घालून महिलांना अधिकाधीक प्रगतीकडे कसे नेता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. या वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारने सुप्रियाला सर्वोत्कृष्ट अंगणवाडी शिक्षक पुरस्काराने गौरविले.
सागर कॉलनी सेंटर मधील सुजाताचे पती नुकतेच वारले. त्यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला. काही दिवसांनी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. अनेक कुटूंबांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.गरजूंना जेवण, अन्नधान्य वाटण्याचे काम सुरु आहे हे समजताच सुजाताने संपर्क साधत मी काही मदत देवू इच्छिते असे सांगितले. जीला स्वतःला मदतीची गरज होती, तीच व्यक्ती दुस-याला मदत करण्यास पुढे आल्याचे पाहून आम्हाला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. सुजाताने पन्नास किलो सुवासिक इंद्रायणी तांदूळ दिला. तो आम्ही पंचवीस गरजू महिलांना दिला. सहृदयतेची अशी अनेक उदाहरणे ग्यानरुची सेंटर मध्ये दिसतात.